किल्ले प्रबळगड ट्रेक - 03 सप्टेंबेर 2017

सह्याद्री आपल्याला अमर्याद आनंद देत असते. पण प्रत्यक्ष सकर्मे सह्याद्रीचे ऋण फेडणारी माणसे विरळच. त्या गणनेतच माझा एक सह्यमित्र म्हणजे ट्रेकर्स जर्नी संस्थेचा म्होरक्या प्रशांत भोईर. प्रशांतने जेव्हा किल्ले प्रबळगडचा ट्रेक लावला तेव्हाच माझ्या मनात ट्रेकवर जायची इच्छा प्रबळ झाली. पनवेलला एस. टी. स्थानकात सकाळी 7 वाजता भेटायचे ठरले होते. मला तर या दिवशी फार लवकर उठावे लागणार होते. सर्व पर्याय चाचपून पाहिले. वडाळावरून पनवेल लोकल पकडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मी 5.40 ची लोकल पकडली. 4 वाजता उठल्यामुळे डोळ्यावरची झोप काही जात नव्हती. मला वाटले की गाडीत बसायला मिळेल मग थोडी झोप काढू. पण रविवार असला तरी गाडीला बरीच गर्दी होती. हा गणपती दर्शनासाठी शेवटचा सुट्टीचा दिवस होता. म्हणून लोकं सह-कुटुंब गणरायाच्या दर्शनासाठी सकाळीच निघाले होते - गर्दी टाळण्याच्या हिशोबाने. त्यात त्यांना कितपत यश मिळाले हे त्यांचे त्यांनाच ठाऊक :) पनवेल स्टेशनला लोकल आल्यावर मला प्रशांतचे फोन आले. मला वाटले की मला उशीर झाला आहे की काय. मी धावत-पळत एस. टी. स्थानकात आलो. काही जण आधीच जम...