उंबरखिंड ते नागफणी ट्रेक - 17 जून 2017


मॉन्सूनने या वर्षी हजेरी जरा उशिराच लावली आहे. पण माझ्या या पावसाळी ट्रेकिंग पर्वाची सुरूवात महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाणेघाटच्या नाईट ट्रेकने झाली. पण नाणेघाटला पाऊस तसा रिप-रिपच होता. म्हणून पहिल्या पावसात भिजायची मजा मात्र काही त्या ट्रेकवर घेता आली नाही. पुढच्या आठवड्यातही पावसाने ही आशा दाखवली नाही. 

मी नियमीत ट्रेकिंग करतो हे ऑफीस मध्ये सर्वज्ञात आहे. नीरज या माझ्या सहकार्‍याने सुचवले की तू ऑफीसच्या लोकांसाठी एक ट्रेक लावला पाहिजेस [ ट्रेकर मंडळींच्या भाषेत 'ट्रेक लावणे' म्हणजे ट्रेकचे नियोजन करणे :) ]. आता ऑफीसची जनता काही आपली रोजची भटके कंपनी नव्हे. कधी कुठेतरी ट्रेकच्या नावावर एखादा छोटा-मोठा डोंगर एके काळी चढले असतील. सह्याद्रीमध्ये ट्रेकिंगबद्दल गैरसमज असणारे, कुतूहल असणारे तर काही सह्याद्रीला हलक्यात मोजणारे. या टोळीला कोणत्या ट्रेकवर घेऊन जावे, असा मला प्रश्न पडला. ट्रेक सरळसोपा असावा, जास्त चढ-उतार नको, लंचला गावरान चिकन असावे, धबधब्यात डुंबायला मिळावे असे आर्जवे माझ्याकडे आले. मी आधी उल्हास नदी खोरे अथवा माथेरान सनसेट पॉइंटच्या ट्रेक्सचा विचार करत होतो. पण उल्हास नदीच्या खोर्‍यात आधी उतरून मग परत शूटिंग पॉइंट-खंडाळा पर्यंत चढणे किती लोकांना शक्य होईल त्यावर माझा संशय होताच. 'माथेरानला खूप वेळा जाऊन आलो आहोत', असे म्हणत लोकांनी माथेरानच्या ट्रेक्स पण बाद केल्या.   

शेवटी मी 'उंबरखिंड ते नागफणी' या ट्रेकची निवड केली. ट्रेकमध्ये आम्ही खोपोली जवळ चावणी गावात येऊन उंबरखिंडला भेट देणार होतो. मग अंबा नदीच्या अंगाने कुरवंडे घाट मार्गे खंडाळयात स्थित कुरवंडे गावात पोहोचून पुढे नागफणीचा डोंगर सर करणार होतो. अंबा नदीकाठी उभारलेले उंबरखिंड स्मारक शिवकालीन इतिहासाची अबोल साक्ष देत उभे आहे. औरंगझेबचा मामा शास्ताखानने पुणे काबीज केले तेव्हा शिवाजी महाराज कोकणात स्वारीवर होते. शिवाजी महाराजांना शह देण्यास शास्ताखानने मोगल सेवेत असलेल्या उझबेकी सरदार कारतालाब खानला कुरवंडे घाट मार्गे कोकणात उतरायचे आदेश दिले. कारतालाब खानची खबर मिळताच महाराज व सरलष्कर नेताजी पालकर यांनी उंबरखिंडमध्ये जाळ पेरला. खिंडीच्या दोन्ही बाजूला असणार्‍या टेकड्यंवर मराठा सैन्य दबा धरून बसले व खानाची पावलोन्पावली हालचालींची खबर घेतली. खानाचे सैन्य खिंडीत घुसल्यावर मराठा सेना त्यांच्यावर त्वेषाने तुटून पडली. खानाचे सैन्य मराठा सेनेच्या चाळीस पट होते. तरी निकराने दिलेला लढा व व्ह्यूहरचनेची  चोख अंमलबजावणी केल्यामुळे, खुद्द शिवरायांच्या नेतृत्वाखाली लढलेली मराठा सेना विजयी झाली.

मी श्वेताकडून टूर कंपनीचा नंबर घेऊन बस बूक केली. कुरवंडे गावात जेवणाची सोय करायला मी विलास बोरकर यांच्याशी संपर्क साधला. व्हेज आणि नॉन व्हेज विकल्पांंमध्ये जेवण काय असेल ते ठरवले. विलासकाका मला दररोज फोन करत. त्यांना चिंता होती की मी सांगितले तसे 13 लोक येतील का ट्रेकवर. नाहीतर त्यांनी बनवलेले जेवण फुकट जाऊ शकते. आणि विलासकाकाची शंका खरी ठरली.  या ना त्या कारणाने लोकांनी डच्चू दिला. कोणी आजारी पडले तर कोणाला अचानक काम आले. ट्रेकसाठी आधी 13 लोकं 'हो' म्हणाले होते, पण ट्रेक चा दिवस उजाडेपर्यंत फक्त 9 जण उरले.  आमची ट्रेक आता थोडी महाग होणार होती. 600 रुपयांची ट्रेक आता 900 रुपयांवर आली होती. तरी उत्साही मंडळी ट्रेकवर जाण्यास माघार घ्यायला तयार नव्हती. आम्ही ठरवले की लोकं कमी झाले तरी ट्रेक करायची.    अखेर ट्रेकचा दिवस उजाडला. 17 जून 2017. बस ओबेरॉई मॉल गोरेगाव येथून सकाळी 6:30 ला सुटणार होती. श्रद्धा, श्रेया, सोम्या आणि रवी प्रथम तिथून चढणार होते. इतर सर्वजण वेळेवर पोहोचले पण रवीला पोहोचायला मात्र थोडा उशीर झाला. बस सुमारे अर्धा तास उशीरा सुटली. मी, नीरज व त्याची पत्नी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड वरून अंधेरीला तर भास्कर पवईला चढणार होते. बसमध्ये चढल्यावर मला कळले की रवीची पत्नी पण आमच्यासोबत ट्रेकवर आली आहे. आता आम्ही 10 जण झालो होतो. भास्कर आणि तेजला बस मध्ये घेऊन आम्ही मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग पकडला. मी बसमध्ये सर्वाना आसमन्तात दिसणारे किल्ले दाखवत होतो. कर्नाळा, इर्शाळगड, प्रबळगड, कलावन्तीणदुर्ग, माणिकगड व माथेरानचे डोंगर कोवळ्या उन्हात धुक्याचे आवरण अलगद सोडत होते. खोपोलीला एक्सप्रेसवे सोडून आम्ही श्री दत्त स्नॅक्स कॉर्नर मध्ये न्याहारी करायला पोहोचलो. तेथे श्रद्धाच्या आग्रहाने सर्वांनी थालीपीठ हा अस्सल महाराष्ट्रीय खाद्यप्रकार प्रथमच चाखला.  शिरा, उपमा, पोहे, चहावर पोटभर ताव मारला.

  
तेथून आम्ही थेट पालीचा रस्ता गाठला. खोपोली-पाली रस्त्यावर एक फाटा फुटतो जो थेट आपल्याला उंबरखिंड स्माराकाजवळ घेऊन येतो. इतिहासाची माहिती व सह्याद्रीच्या किल्ल्यांचा आढावा घेत आम्ही पुढे ट्रेकची सुरूवात केली. चावणी गावात काही नवे गृहनिर्माण उपक्रम व शहरी लोकांच्या चैनीसाठी उभारलेल्या 'वीकेंड होम्स'मुळे कुरवंडे घाटाच्या पायथ्याला जाणारी वाट मिळणे मुश्कील झाले आहे. आम्ही एका गावकर्‍याची मदत घेतली. एका मळलेल्या वाटेने त्याने आम्हाला घाटपायथ्याशी सोडले. पुढचा चढ जरा नवख्यांसाठी तीव्र होता. आम्ही थोडी विश्रांती घेतली. पण माझ्या नकळत इतर लोकांनी इथे येईपर्यंत अर्ध्याहून जास्त पाणी संपवले होते! हे मला पहिला चढ चढून गेल्यावर कळले. तो चढ चढणे बर्‍याच लोकांना जड गेला. उरलेले पाणी तिथे संपले. सूर्यसुद्धा ढगांआड जायला तयार नव्हता. उन्हाने सगळे ग्रासले होते. नीरज आणि सोम्याला पुढे चढवेना. मी कसेबसे त्यांना चढवलेही असते पण पाण्याच्या अभावी ते घाट चढू शकत नव्हते. पाण्याचा सर्वात जवळचा स्रोत खाली गावाच्या कडेने वाहणारी अंबा नदी होती. परत खाली उतरून पाणी भरून पुन्हा तो चढ चढायचा इतर कुणातही त्राण नव्हता.

मग आम्ही ट्रेक तिथेच संपवायचा निर्णय केला. मी ठरवले की पाण्याशिवाय नवख्याना चढवू शकत नाही. आम्ही आमची बस कुरवंडेला पुढे पाठवून दिली होती. बस चालक सावंतकाकांना फोन करून बस आम्ही परत चावणी गावात बोलावली. 

उतरताना मी सर्वांना अंबा नदीच्या डोहात घेऊन आलो. नदीचे निखळ पाणी पाहून थकलेल्या मंडळीमध्ये पुन्हा हूरहुर आली. पाणी पाहून सगळ्यांच्या मनाच्या कळ्या खुलल्या! आणि पापण्या मिचकावण्याच्या आत टोळीने नदीत उडी मारली! पाण्यात उतरून थकवा नाहीसा झाला. पण मी ट्रेकचा परत विषय काढल्यावर मात्र सगळ्यांची तोंडे वाकडी झाली. आता कोणालाही ट्रेकची काही पडलेली नव्हती. मजामस्ती साठी अंबा नदीचा होळ जो मिळाला होता. आम्ही साधारण दोन अडीच तास पाण्यात यथेच्छ डुंबलो. माझ्यासाठी हे नवे नसले तरी इतरांना त्यांच्या शहरी जीवनातून उसंत मिळून परत कधी असा आनंद घेता येईल हे सांगता येणे शक्य नव्हते. म्हणून मी पण ट्रेक न झाल्याची खंत न बाळगता नदीच्या पाण्यात मनमोकळे पोहलो. पण मला आता विलासकाकांचा सतत फोन येत होता. त्यांना काळजी लागली होती की आम्ही अजून कुरवंडे गावात कसे पोहोचलो नाही. त्यांना केलेले जेवण फुकट जाईल व आम्ही पैसे न देताच मुंबईला परत जाऊ याचीही चिंता होती.  मी त्यांना आश्वासन दिले की आम्ही बस करून कुरवंडेला येत आहोत. काही जणांना उन्हाचा त्रास झाल्यामुळे ट्रेक बंद करावी लागली होता. चावणी गावात येईपर्यंत वरुणदेवाने कृपा केली. पावसाच्या सरी आता त्या टुमदार गावावर निसर्गाची हिरवीगर्द छटा उमटवत होत्या. कोकणातली लाल माती अंबा नदी पाटबंधारांद्वारे भातखाचरांत पेरत होती. गावातली बच्चे कंपनी नदीत उड्या मारण्याची शर्यत लावून खेळत होती.

बस आल्यावर आम्ही एक्सप्रेसवे ने सह्याद्री चढून कुरवंडे गावात आलो. तिथे बोरकरकाका आमची वाट पाहत होतेच. सगळ्यांना अगदी कडकडून भूक लागली होती. काका-काकूंनी आमच्यासाठी केलेले जेवण वाढले. आम्ही त्यांच्याशी बराच वेळ गप्पा मारल्या. त्यांनी इतक्या आपुलकीने आमचा पाहुणचार केला की मला ऑफीस मधली लोकं विचारत होते की त्यांना मी किती वर्ष ओळखतो? खरे तर मी त्यांना त्याच दिवशी भेटलो होतो. पण ट्रेकिंगची हीच तर मजा आहे, जिथे काही तासांपूर्वी अनोळखी असणारी माणसे अल्पावधीत जिवाभावाची होतात.

आम्ही बोरकरांचा निरोप घेऊन मुंबईचा मार्ग पकडला. परतीच्या प्रवासात काही
लोकं झोपली. आम्ही श्रेयाला मराठी शिकवण्यात मग्न झालो. नंतर इतर लोक उठल्यावर '20 प्रश्न' हा खेळ खेळलो ज्यात लोकांनी विचित्र गोष्टी मनात धरल्या - यात 'शक्तिमान' ही होता!

ट्रेक पूर्ण न झाल्यामुळे मला वाईट तर वाटले पण ऑफीसच्या सवंगड्यांबरोबर एक वेगळा अनुभव घेतल्याचा आनंदही होतच. मात्र घरी आल्यावर कळले की माझ्या बाबांना बरे नाही. त्यांना दुसर्‍याच दिवशी नर्सिंग होम मध्ये भरती करावे लागले. म्हणून पुढचा आठवडा त्यांच्या औषधोपचारात गेला. त्यामुळे मला या आठवड्यात ट्रेक मारता [ ट्रेक मारणे = ट्रेकवर जाणे :P ] आला नाही पण आशा आहे की पुढच्या आठवड्यात एखादा  जरूर होईल :)

       

Comments

Post a Comment