किल्ले प्रबळगड ट्रेक - 03 सप्टेंबेर 2017

सह्याद्री आपल्याला अमर्याद आनंद देत असते. पण प्रत्यक्ष सकर्मे सह्याद्रीचे ऋण फेडणारी माणसे विरळच. त्या गणनेतच माझा एक सह्यमित्र म्हणजे ट्रेकर्स जर्नी संस्थेचा म्होरक्या प्रशांत भोईर. प्रशांतने जेव्हा किल्ले प्रबळगडचा ट्रेक लावला तेव्हाच माझ्या मनात ट्रेकवर जायची इच्छा प्रबळ झाली. पनवेलला एस. टी. स्थानकात सकाळी 7 वाजता भेटायचे ठरले होते. मला तर या दिवशी फार लवकर उठावे लागणार होते. सर्व पर्याय चाचपून पाहिले. वडाळावरून पनवेल लोकल पकडण्याशिवाय गत्यंतर नव्हते.  

मी 5.40 ची लोकल पकडली. 4 वाजता उठल्यामुळे डोळ्यावरची झोप काही जात नव्हती. मला वाटले की गाडीत बसायला मिळेल मग थोडी झोप काढू. पण रविवार असला तरी गाडीला बरीच गर्दी होती. हा गणपती दर्शनासाठी शेवटचा सुट्टीचा दिवस होता. म्हणून लोकं सह-कुटुंब गणरायाच्या दर्शनासाठी सकाळीच निघाले होते - गर्दी टाळण्याच्या हिशोबाने. त्यात त्यांना कितपत यश मिळाले हे त्यांचे त्यांनाच ठाऊक :)

पनवेल स्टेशनला लोकल आल्यावर मला प्रशांतचे फोन आले. मला वाटले की मला उशीर झाला आहे की काय. मी धावत-पळत एस. टी. स्थानकात आलो. काही जण आधीच जमले होते. एक मोठा नवख्या ट्रेकर्सचा ग्रूप पण होता. पण आमच्यातले एक जण - राजेश राव काका अजून पोहोचले नव्हते. उलट त्यांना पोहोचायला बराच उशीर होणार होता. त्यांची वाट पाहत आम्ही तिथेच गप्पा रंगवल्या. प्रशांत व मोनालीला मी खूप दिवसांनी भेटलो होतो. या काळात केलेल्या ट्रेक्सची वर्णने व एकत्र केलेल्या ट्रेक्सच्या आठवणींनी वेळ काढला.  7 ची बस सोडल्यामुळे आता 8 ची बस पकडायची होती. प्रबळगडचे पायथ्याचे गाव म्हणजे ठाकूरवाडी. तसे साधारण एक-दीड तासाने पनवेल व ठाकूरवाडी दरम्यान बस उपलब्ध आहेत. पण आम्ही बघतो तर काय - 80 पोरांची टोळी आमच्याच गाडीने ठाकूरवाडीला येणार होती - प्रबळ अथवा कलावंतीणदुर्गच्या ट्रेकला. त्यात राव काक पण पोहोचले. 8 ची बस लागल्यावर आम्ही पटकन गाडीत शिरलो व जागा पकडल्या. सुदैवाने तो ग्रूप दुसर्‍या गाडीने गेला.

पनवेलवरून ठाकूरवाडीला यायला 30-45 मिनिटे लागतात. ठाकूरवाडीच्या आधी प्रबळमाचीला जायला एक फाटा फुटतो. आम्ही तिथेच उतरलो. समाज माध्यमांमुळे प्रबळ आणि कलावंतीणदुर्गची ट्रेक लोकप्रिय होत चालली आहे. पण त्यात कलावंतीणदुर्गची दुर्दशा विकोपास गेली आहे. एके काळी पावसाळ्यात अवघड असणार्‍या या दुर्गाची ट्रेक आता सर्रास पावसात होते. नवखे, अतिउत्साही पोरे फेसबूकवर चित्र व वीडियो बघून अननुभवी, बाजारू ग्रूप्स बरोबर कलावंतीणदुर्गच्या कातळ-कोरीव पायर्‍यांवर आपल्या जीवाशी खेळायला येतात. पण प्रबळगड समाज माध्यमांच्या कवेत न आल्यामुळे जरासा वाचला आहे.

ट्रेक सुरू करायच्या आधी डाएटीशियन मोनालीने आणलेल्या दक्षिण भारतीय न्याहारी प्रकार - अप्पेन्वर आम्ही ताव मारला. ट्रेकर्स जर्नी संस्थेच्या ट्रेकर्सना पौष्टिक आहार मिळतो ही या ग्रूपची खासियत आहे. ठाकूरवाडी ते प्रबळमाचीचा चढ हा ट्रेकचा पहिला टप्पा आहे. पनवेलला एस. टी. स्थानकात भेटलेली 80 पोरांची टोळी आमच्या मागून येऊन आम्हाला मागे सोडत प्रबळमाचीचा चढ चढत होती. चढ जरा तीव्र असल्यामुळे आणि ग्रूप मधील अननुभवी मंडळींना लागणारा दम यामुळे आमची गती संथ पण सावध होती. प्रबळच्या परिसातील गर्द-दाट जंगलामुळे ट्रेक करताना पावले थकत असतानाही मन मात्र प्रफुल्लीत झाले होते. वाटेवरून दिसणार्‍या धबधब्यांचे दृष्य डोळ्यात साठवत आम्ही प्रबळमाची गाठली. थोड्या थोड्या वेळाने विश्रांती घेत आणि फोन मध्ये ग्रूप फोटो काढत प्रबळमाची पर्यंतचा चढ काही फार थकवणारा वाटला नाही.


प्रबळमाचीच्या थोड्याच आधी गडाच्या पायर्‍या लागतात. उद्ध्वस्त झालेली तटबंदी पण माथ्यावर येते. शेवटच्या काही अंतरावर एक बुरूजपण आहे. पण किल्ल्याचे हे अवशेष दगड-मातीच्या ढिगार्‍याखाली गेले आहेत. इथे उत्खनन करून किल्ल्याचा इतिहास पुन्हा उजेडात आणणे गरजेचे आहे.

प्रबळमाचीवर कॅमपिंग एवढे लोकप्रिय झाले आहे की तिथले गावकरी विशेषतः निलेश भूतंबरे तंबू व कॅमपिंगचे इतर साहित्य भाड्यावर देतात व माचीवरची मोकळी जागा कॅमपिंगसाठी वापरली जाते. पण आम्हाला दुसरा टप्पा म्हणजेच प्रबळगड पर्यंतचा चढ चढायचा होता. निलेशच्या घरी अवजड सामान ठेवून आणि फक्त आवश्यक  गोष्टी बरोबर घेऊन आम्ही प्रबळगड चढायला सुरूवात केली. प्रबळमाचीवर गोमा शिंदे यांचेही घर आहे. त्यांचा मुलगा केतन हा आमच्या सोबत वाटाड्या म्हणून आला. प्रशांतने केतनच्या शिक्षणासाठी पुस्तके व वह्या त्याला दिल्या आहेत व पुढच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पण आम्ही देऊ जर पुढे शिक्षण चालू ठेवायची त्याची जिद्द असली तर, असेही प्रशांत म्हणतो.


प्रबळगडचा पुढचा चढ अगदी दाट जंगलातून करावा लागतो. पावसामुळे माती ओली झाली होती. सावध पावलानी व आवश्यक तिथे रांगून आम्ही वर चढत आलो. शेवटचा भाग तर अगदी दगडांवर चढाईचा आहे. गडमाथ्यावर पाऊस असल्यामुळे त्या नळीतून ओहोळ वाहत होते. त्यामुळे दगडांवरून घसरून पडण्याची शक्यता खूप वाढली होती. अगदी बेताने आम्ही तो चढ पूर्ण केला. गडाच्या प्रवेशासमोर एक मोठे खोल पाण्याचे टाके आहे. पावसात ते तुडुंब भरले होते. गडमाथ्यावरचे पठार अगदी विस्तीर्ण आहे. असे म्हटले जाते की माथेरानची निवड करण्याआधी ब्रिटीश राजवटीने प्रबळगडचा विचार त्यांच्या उन्हाळ्यातल्या विसाव्यासाठी केला होता. पण बारमाही पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे त्याना प्रबळ नापसंत पडला. हे किल्ल्याचे सौभाग्यच म्हणावे लागेल!

किल्ल्यावर चार इमारती अद्यापही बर्‍यापैकी शाबूत स्थितीत आहेत. तिथून थोड्याच अंतरावर गणपती, हनुमानच्या दगडात कोरलेल्या मुर्त्या असलेले एक मंदिरही आहे. या वास्तूंचा आढावा घेत आम्ही किल्ल्याच्या मोर्वे धरणाच्या टोकाला स्थित काळा बुरुजाकडे दाट झाडीतून जाणारी वाट पकडली. सप्टेंबेर महिना चालू झाला होता आणि पावसाने थोडी माघार घेतली होती. कारवी व सोनकीच्या फुलांनी प्रबळचे पठार बहरू लागले होते. अजून एक्र-दोन आठवड्यांनी तर हिरवी गर्द पालवी निरनिराळ्या रंगांच्या कुसुमांना आश्रय देताना दिसेल.



किल्ल्यावरच्या शासकीय इमारती पाहून काळा बुरुजाकडे जाताना एक तलाव लागतो. काळा बुरुजापाशी आल्यावर आम्हाला किल्ल्यावरून दिसणारे ईर्शाळगड व मोर्वे धरणाचे विहंगम दृष्य पाहायचे होते. पण तिथे पोहोचून मात्र आमची हिरमोड झाली. सगळा परिसर ढगात गेला होता व किल्ल्यावरून काहीच दिसत नव्हते. काही वेळ आम्ही तिथेच विश्रांती केली. मग सोबत आणलेल्या काकड्या फस्त केल्या. ढगांची चादर काही गडपरिसरावरून बाजूला होत नव्हती. मग आम्ही नाद सोडून परतीची वाट पकडली. पठारावरचे जंगल इतके दाट आहे की केतन नसता तर आम्ही नक्कीच हरवलो असतो. केतनने झाडी-फांदीतून वाट काढत आम्हाला गडाच्या प्रवेशावर आणले. तेथून कलावंतीण दुर्गचे दृष्य दिसणार्‍या टोकाकडे जाणारी वाट पण आहे पण वेळेच्या अभावामुळे आम्ही तिथे न जाण्याचा निर्णय घेतला. त्याहून अधिक आमच्यातली एक मुलगी पाय सुजल्यामुळे फार संथ गतीने चालत होती. गड उतरायला मग काळोख झाला असता.


आम्ही पट-पट गड उतरायला सुरूवात केली. प्रथम दगडांवरून उतरायचे होते. त्या नळीतून वाहणर्‍या ओहोळात पाणी वाढले होते. आम्हाला अगदी सावधपणे, इतरांना ठीक-ठिकाणी हात देऊन, उतरावे लागत होते. नळ संपल्यावर उतार जरा सोपा झाला.


प्रबळमाचीवर पोहोचल्यावर आम्ही केतनला 'पुन्हा भेटू' असे म्हणत निरोप दिला. निलेश भूतंबरेच्या घरी परत येऊन आम्ही थोडा विसावा घेतला. प्रशांतने जेवणाची सोय इथेच केली होती. आम्हाला तर कडकडून भूक लागली होती. पिठले-भाकरी-पोळी-डाळ-भाजी अशी मेजवानी असताना कोणाला भूक नाही लागणार? आम्हाला 6 ची एस. टी. पकडायची होती पण मागच्या फळीचा वेग कमी असल्याने व जागो-जागी विश्रांतीसाठी काही वेळ घेतल्यामुळे 6 ची एस. टी. मिळणार नाही हे कळून चुकले. पुढची बस 8 ची होती. आणखी म्हणजे आमच्या मागून आलेला 80 पोरांची टोळी पण आमच्या मागून गड उतरत होती. त्यामुळे 8 च्या बस ला प्रचंड गर्दी होणार होती. मग प्रशांतने तिथे असलेल्या एका दुसर्‍या ग्रूपच्या म्होरक्याला भेटून तीन गाड्या बोलावून घेतल्या. आम्ही गड उतरून गडपायथ्याशी असलेल्या वाहन-तळात आलो तोपर्यंत गाड्या पोहोचल्या होत्या. पण गाडी-चालकांना आमची अडचण कळली होती. म्हणून मुद्दामून त्यांनी ठरलेली रक्कम 200 रुपयाने वाढवून सांगितली. यामुळे आमच्यात व चालकांमध्ये वादा-वादी झाली. शेवटी आम्ही गाडीत बसून पनवेलपर्यंत पोहोचलो.

माझी अंधेरी लोकल चुकली. मग आम्ही सि.एस.टी.ची ट्रेन पकडली. राव काका, विनायक आणि निखीलबरोबर गप्पा-टप्पा करण्यात अंधेरीला कधी पोहोचलो हे कळलेच नाही. ट्रेक मध्ये नवीन ट्रेक सवंगडी तर भेटलेच, पण प्रशांत आणि मोनाली सारख्या जुन्या-जाणत्या ट्रेकर्स बरोबर आणखी एक ट्रेक मारल्याचे व त्यांच्याकडून नव-नव्या गोष्टी शिकल्याचे समाधानही होते. अशा प्रकारे अगणित मुंबई-पुणे प्रवसांमध्ये साद घालणारा प्रबळ मी जवळ केलाच!


Comments

Popular posts from this blog

उंबरखिंड ते नागफणी ट्रेक - 17 जून 2017